चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*कच्च्या रस्त्यावर बैलांनी भरलेले पिकअप वाहन आणि पोलीस कर्मचाऱ्याची चर्चा; नेमके काय घडले?*
-:हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-
जिवती तालुक्यात मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास माथाडी गोंडगुडा ते सलीमनगर या कच्च्या रस्त्यावर बैलांनी भरलेले एक पिकअप वाहन उभे असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या वाहनाजवळ पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचा विना वर्दीत एक पोलीस कर्मचारी वाहनचालकाशी काही वेळ चर्चा करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, दर मंगळवारी गडचांदूर येथे भरणाऱ्या बैलांच्या आठवडी बाजारातून हे बैल आणले जात होते. मात्र, गडचांदूर-शेणगाव- जिवती मुख्य मार्ग सोडून माथाडी गोंडगुडा ते सलीमनगर या कच्च्या रस्त्यावर वाहन का उभे करण्यात आले? त्याचा सल्ला कोणी दिला? याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
तसेच संबंधित पोलीस कर्मचारी वाहनचालकाशी नेमकी कोणत्या कारणासाठी बोलत होते? ती नियमित चौकशी होती की इतर कोणत्या कारणासाठी संवाद सुरू होता? याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत.
काही जण आर्थिक देवाणघेवाणीबाबतही शंका व्यक्त करत असले, तरी या दाव्यांना कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.
या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे, हे निष्पक्ष चौकशीतून समोर येणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची वस्तुस्थिती तपासून आवश्यक असल्यास कॉल रेकॉर्ड, तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टीप : या वृत्तातील काही बाबी स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर आधारित आहेत. संबंधित आरोप किंवा शंका यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. वस्तुस्थिती सक्षम चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकते.



0 Comments