चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*शेणगावात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूसे मोहम्मदी उत्साहात; शांतता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश*
जिवती: जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रजा जामा मस्जिद, शेणगाव यांच्या वतीने शेणगाव शहरात मुख्य मार्गावरून जुलूसे मोहम्मदी (मिरवणूक) मोठ्या शान-शौकत, उत्साह आणि धार्मिक वातावरणात काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संपूर्ण मिरवणुकीदरम्यान नात शरीफ, दुरूद शरीफ व सलाम पठण करण्यात आले. तसेच अल्लाह आणि पैगंबर हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या गौरवाचे नारे देत परिसर भक्तिमय झाला. मिरवणुकीतून शांतता, प्रेम, बंधुता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. समाजात परस्पर सौहार्द कायम राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जुलूसे मोहम्मदीदरम्यान भाविकांसाठी थंड पाणी, चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, शेणगाव यांच्या वतीनेही मिरवणुकीत सहभागी होत पाणी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य व सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
मुख्य मार्गाने मिरवणूक काढल्यानंतर तिचा समारोप रजा जामा मस्जिद, शेणगाव येथे झाला. येथे पवित्र कुरआन पाकचे तिलावत करण्यात आले तसेच फातेहाखानी करून देश, राज्य आणि समाजात शांतता, सुख-समृद्धी व भाईचारा नांदावा अशी विशेष दुआ करण्यात आली.
यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांना मसाला भात, खिचडी आणि खीर यांचे वाटप करण्यात आले. मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने हा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला.
या संपूर्ण जुलूसे मोहम्मदीदरम्यान पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे तसेच सर्व समाजबांधवांचे रजा जामा मस्जिद व्यवस्थापन समितीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित हा जुलूसे मोहम्मदी केवळ धार्मिक उत्सव न राहता शांतता, मानवता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा सोहळा ठरला.



0 Comments