चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
पल्लेझरीत गांजाची शेती उघडकीस; पोलिसांचा छापा, ४.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
जिवती तालुक्यात खळबळ दोन आरोपीवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
पल्लेझरी | चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पल्लेझरी येथे गांजासदृश अंमली पदार्थांची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शेतावर छापा टाकून पाने व फुले असलेली ओली ताजी झाडे जप्त केली. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन ८.८८० किलोग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत ४ लाख ४४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पल्लेझरी येथील गोविंद पोले आणि बाबू नामदेव बिजे यांच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिवती तालुक्यातील अंमली पदार्थांच्या बेकायदा लागवडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित शेताची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी गांजासदृश अंमली पदार्थांची पाने व फुले असलेली झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक खिद्र अटकडे आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले, पोलीस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांच्यासह प्रांजल झिलपे, निलेश देशमुख, रवींद्र येडतलवार, दिनेश मेश्राम, अजय सोडणार, विजय कोटांगले, सूरज मेले, प्रकाश बाजगीर, गजानन पोले, अमर पिंडनकर, ज्ञानेश्वर मांडवे आणि शिवाजी गोरे सहभागी झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू भांडवले करीत आहेत. जप्त झाडांचे अधिकृत स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींची सखोल तपासणी केली जाणार आहे. तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज | चंद्रपूर
टीप : संबंधित व्यक्तींवरील आरोप सिद्ध होणे न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहे.



0 Comments