चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख
*नगराळा आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरण; एफडीएकडून अन्नाचे नमुने जप्त, विद्यार्थी पटसंख्येच्या नोंदींचीही चौकशी करण्याची मागणी*
जिवती, दि. २ सप्टेंबर : जिवती तालुक्यातील श्री संजय गांधी प्राथमिक आश्रम शाळा, नगराळा तसेच श्री अंबु नाईक माध्यमिक आश्रम शाळा, नगराळा येथे दि.१ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने संबंधित अन्नाचे तसेच अन्न धान्य नमुने जप्त करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या नोंदींचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्राथमिक आश्रम शाळेत ६८ तर माध्यमिक आश्रम शाळेत १६० अशी एकूण २२८ विद्यार्थ्यांची उपस्थित पटसंख्या असल्याचे सांगण्यात आले. दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासाठी शिजविलेल्या डाळीत विषारी पाल आढळून आल्याची माहिती समोर आली. या अन्नाचे सेवन केलेल्या प्राथमिक शाळेतील ४ व माध्यमिक शाळेतील २७ अशा एकूण ३१ विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या व मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने जिवती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सर्व विद्यार्थ्यांना राजुरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर व समाधानकारक असल्याची माहिती संबंधित मुख्याध्यापकांनी दिली.
दि. २ सप्टेंबर रोजी जिवती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने दोन्ही आश्रम शाळांना भेट देऊन उर्वरित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व आवश्यक औषधोपचार केले. त्याचबरोबर चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिजविलेल्या अन्नाचे तसेच इतर अन्नधान्याचे नमुने जप्त करून तपासणीसाठी घेतले. अन्नाच्या गुणवत्तेची व सुरक्षिततेची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीही मागविण्यात आल्याची माहिती मिळाली. केंद्रप्रमुखांनीदेखील शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. शाळा प्रशासनाकडून सुमारे २२८ विद्यार्थ्यांची पटसंख्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दि. २ सप्टेंबर रोजी काही पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट दिली असता शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांनी, विषबाधेच्या घटनेनंतर अनेक पालक आपल्या पाल्यांना घरी घेऊन गेल्यामुळे उपस्थिती कमी असल्याचे स्पष्टीकरण दिले.
तथापि, या स्पष्टीकरणाबरोबरच काही नागरिक व सामाजिक स्तरातून विद्यार्थ्यांची नोंदवहीतील पटसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यामध्ये काही तफावत आहे का, याचीही सक्षम अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित विभागांनी अधिकृत नोंदी, उपस्थिती रजिस्टर, प्रवेश अभिलेख आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन, आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडून आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तपास अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित होणार आहे.



0 Comments