Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख


आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील आकांक्षित जिवती तालुक्यातील नगराळा येथील श्री अंब्रु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवारी धक्कादायक प्रकार घडला. दुपारचे जेवण घेतल्यानंतर तब्बल ३१ विद्यार्थ्यांना उल्ट्या, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने शाळा प्रशासनाने त्यांना तातडीने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकात पाल पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निष्कर्ष अन्न नमुन्यांची तपासणी आणि अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे आश्रमशाळांमधील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी प्रशासनाने या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तसेच जिवती तालुक्यातील सर्व आश्रमशाळांमधील स्वयंपाकगृहे, अन्नाची गुणवत्ता, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची तपासणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत शासन व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments