Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

फार्मर आयडीच्या अडथळ्यामुळे कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहणार नाही!आमदार देवराव भोंगळेंचा शब्द; १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*फार्मर आयडीच्या अडथळ्यामुळे कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहणार नाही!
आमदार देवराव भोंगळेंचा शब्द; १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन*



जिवती, दि. ८ ऑगस्ट २०२६ :
जिवती तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ऑनलाइन फार्मर आयडीची अट शिथिल करून ऑफलाइन पद्धतीने फार्मर आयडी अथवा पर्यायी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद (जागीरदार) यांनी केली.
आज भाजपा जनसंपर्क कार्यालय, जिवती येथे आयोजित जनता दरबारात राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव दादा भोंगळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
जिवती तालुका हा दुर्गम व आदिवासीबहुल भाग असून, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप ऑनलाइन सातबारा उपलब्ध नसल्याने फार्मर आयडी तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही केवळ तांत्रिक प्रक्रियेअभावी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘ऑनलाइन नोंद नाही म्हणून कर्जमाफी नाही’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर लादणे अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे शासनाने दुर्गम भागातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन फार्मर आयडीची सक्ती शिथिल करावी आणि ऑफलाइन किंवा पर्यायी पडताळणी प्रक्रिया तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
आमदारांचा ठाम शब्द—‘एकही शेतकरी वंचित राहणार नाही!’
निवेदन स्वीकारताना आमदार देवराव दादा भोंगळे यांनी या प्रश्नावर आपण यापूर्वीच प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले. “मी दोन दिवस अगोदरच यासाठी प्रयत्न केले आहेत. जिवती तालुक्यातील १०० टक्के पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कार्यवाही केली जाईल,” असा शब्द आमदार भोंगळे यांनी निवेदनकर्त्याला दिला.
त्यामुळे आता प्रशासन आणि संबंधित विभाग या प्रश्नावर नेमकी कोणती कार्यवाही करतात, याकडे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना असताना कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी किंवा तांत्रिक अडचणी या पात्र शेतकऱ्यांच्या हक्काच्या लाभाच्या आड येऊ नयेत, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आमदारांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न मार्गी लागल्यास जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद (जागीरदार) यांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments