Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिल्हा परिषद शाळेलगत घाणीचे साम्राज्य; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*जिल्हा परिषद शाळेलगत घाणीचे साम्राज्य; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर*


जिवती:- जिवती नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत आणि संरक्षण भिंतीलगत साचलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे संरक्षण भिंतीलगत शेणखताचे मोठमोठे उखंडे टाकून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रकाराकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र चर्चा शहरात सुरू आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या समोरच तालुका कृषी कार्यालय असल्यामुळे या मार्गावर दिवसभर अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र परिसरात साचलेल्या घाणीमुळे व पावसाळ्यात वाढलेल्या दुर्गंधीमुळे सर्वांनाच नाक दाबून ये-जा करण्याची वेळ आली आहे. 

दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज या अस्वच्छ वातावरणातून जावे लागत असून, शिक्षकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

कृषी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी घाण साचणे, शेणखताचे ढिगारे उभारणे आणि संरक्षण भिंतीला लागून अतिक्रमण होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, नगरपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

दरम्यान, "शाळा व्यवस्थापन समिती केवळ नावालाच आहे का?" असा सवालही पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असताना या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

आता तरी जिवती नगरपंचायत प्रशासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी तातडीने या परिसराची पाहणी करून घाणीचे साम्राज्य हटविणार का, अतिक्रमणावर कारवाई करणार का आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणार का, याकडे संपूर्ण जिवतीकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments