Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

अतिदुर्गम बॉंम्बेझरी गावातील विद्यार्थ्यांना चिखलातून शिक्षकांची कसरत; विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*अतिदुर्गम बॉंम्बेझरी गावातील विद्यार्थ्यांना चिखलातून शिक्षकांची कसरत; विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह*


राजुरा, दि. १४ ऑगस्ट २०२६ : राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील नोकरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बॉंम्बेझरी गावात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता आजही केवळ पाऊलवाट स्वरूपात असून, पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अत्यंत कठीण झाले आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी चिखलामुळे शाळेत येऊ शकत नसल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना आणावे लागते. काही ठिकाणी शाळेपासून सुमारे २०० मीटर अंतरावर विद्यार्थ्यांना उचलून शाळेत नेण्याची वेळ शिक्षकांवर येत असल्याचे सांगण्यात आले. या परिस्थितीमुळे शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, बॉंम्बेझरी हे गाव माणिकगड सिमेंट कंपनीने दत्तक घेतलेले असल्याचे सांगितले जात असले, तरी गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर, कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर सचिन भोयर यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना, "या गावाच्या विकासाकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले आहे. विविध काळात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी सत्ता भूषविली; मात्र आदिवासी भागातील या गावाला आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत," असा आरोप केला.
त्यांनी पुढे असा दावाही केला की, शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे, शाळेच्या परिसरात गवत आपल्यामुळे विषारी जीव जंतूचा धोका निर्माण झालेला आहे, संगणक व एलईडी टीव्ही बंद अवस्थेत आहेत. तसेच गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत १०८ किंवा ११२ सारख्या सेवांशी संपर्क साधणेही कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या या शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण असून एक शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याबाबत बोलताना, आदिवासी भागात आवश्यक शैक्षणिक व पायाभूत सुविधा नसल्यामुळेच विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा आरोप सचिन भोयर यांनी केला.
यावेळी काही स्थानिक आदिवासी युवकांनीही आपली भूमिका मांडताना, "आमच्या मुलांवर शिक्षण घेत नाहीत असा आरोप केला जातो; मात्र रस्ता, नेटवर्क, शैक्षणिक सुविधा आणि इतर मूलभूत सोयींचाच अभाव असेल तर मुलांनी शिक्षण कसे घ्यावे?" असा सवाल उपस्थित केला.
सचिन भोयर यांनी असा दावाही केला की, माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते; मात्र अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
ग्रामस्थांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने शाळेकडे जाणारा रस्ता तयार करावा, पिण्याच्या पाण्याची, डिजिटल शैक्षणिक साधनांची व मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments