चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*स्वस्त धान्य दुकानात मका वाटप बंद करा, गहू वाटप सुरू करा; सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांची मागणी
जिवती हा अतिदुर्गम, आदिवासी व डोंगराळ तालुका असून येथील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून शेती करत असल्याने त्यांचे उत्पन्न अनिश्चित असते. अशा परिस्थितीत शासनाने सर्वसामान्य जनतेच्या अन्नसुरक्षेचा विचार करून स्वस्त धान्य दुकानांमधून मका वाटप बंद करून त्याऐवजी गव्हाचे वाटप करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांनी केली आहे.
उद्धव गोतावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित केला जाणारा मका निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार अनेक लाभार्थ्यांकडून केली जात आहे. हा मका खाण्यायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे अनेक लाभार्थी तो वापरण्यास टाळाटाळ करत आहेत. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा उद्देश गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडेल असे धान्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
जिवती तालुक्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना दर्जेदार गहू उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा लाभ होईल. त्यामुळे संबंधित पुरवठा विभागाने तसेच प्रशासनाने या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तहसीलदार, जिवती यांनी स्थानिक परिस्थिती, नागरिकांच्या अडचणी आणि लाभार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून स्वस्त धान्य दुकानांमधील मका वाटप बंद करून त्याऐवजी गव्हाचे वाटप सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोतावळे यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून केली आहे.



0 Comments