Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; स्थानिक पोलिसांवर अविश्वास, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; स्थानिक पोलिसांवर अविश्वास, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव*



जिवती:- जिवती तालुक्यातील टेकामांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमायतनगर गावात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थ महिलांनी अखेर आक्रमक भूमिका घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) कार्यालय, गडचांदूर येथे धडक देत निवेदन सादर केले. गावात अवैध दारू विक्रीमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे.
विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी गावात दारूबंदीबाबत जनजागृती बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला टेकामांडवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगन्नाथ मडावी, सरपंच गंगुबाई भुते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील भुते, माजी उपसरपंच देविदास साबणे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन शेख तसेच गावातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्या बैठकीनंतरही कथित अवैध दारू विक्री सुरूच असल्याचा दावा महिलांनी केला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, गावात दारूमुळे दररोज वाद, भांडणे आणि कौटुंबिक कलह वाढत आहेत. अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असून, अल्पवयीन मुलेही व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली आहे.
यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याला पूर्वकल्पना न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र विशेष पथक पाठवून संबंधित ठिकाणी छापे टाकावेत, अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करावी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी नियमित गस्त घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना सरपंच गंगुबाई भुते, पाकीजा सय्यद, शायदा पठाण, नसरीन शेख, अनिता कांबळे, आरती सरोदे, महानंदाबाई फुकटवाड यांच्यासह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, महिलांनी केलेले आरोप स्वतंत्र आहेत. या आरोपांबाबत संबंधित व्यक्ती किंवा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments