Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवतीतील आश्रम शाळांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; गडचिरोलीसारखी घटना होण्यापूर्वी प्रशासन जागे व्हावे- शब्बीर जागीरदार*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*जिवतीतील आश्रम शाळांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; गडचिरोलीसारखी घटना होण्यापूर्वी प्रशासन जागे व्हावे- शब्बीर जागीरदार*


जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव आकांक्षित जिवती तालुका हा आदिवासीबहुल व अतिदुर्गम भाग असून, येथील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित निवास, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वसतिगृह, वीज, आरोग्य सुविधा, अग्निसुरक्षा, संरक्षण भिंत, सीसीटीव्ही, महिला सुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य शासन व आदिवासी विकास विभागाची केवळ प्रशासकीय नव्हे तर संवैधानिक, कायदेशीर व नैतिक जबाबदारी असल्याचे मत सय्यद शब्बीर जागीरदार, विदर्भ अध्यक्ष, पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यक्त केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिवती तालुक्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय व अनुदानित आश्रम शाळेचे सुरक्षा ऑडिट, इमारत स्थैर्य तपासणी, अग्निसुरक्षा तपासणी, वसतिगृहांची पाहणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची तपासणी तसेच मूलभूत सुविधांचे विशेष निरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित विभागांना तातडीने आदेश द्यावेत, तसेच आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत सर्व आश्रम शाळांची सखोल तपासणी करून त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार संस्थांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक नागरिकाला जीवन व सुरक्षिततेचा मूलभूत अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे.
"विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रशासनाने निष्काळजीपणाची भूमिका घेऊ नये. जिवती तालुक्यातील प्रत्येक आश्रम शाळा सुरक्षित, सुसज्ज आणि सुविधायुक्त होईपर्यंत विशेष मोहीम राबवून नियमित तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही," असा इशाराही सय्यद शब्बीर जागीरदार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments