चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*अवैध धंद्यांचा बोलबाला? पिट्टीगुडा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; महिलांमध्ये संताप, कारवाईची मागणी*
*हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
जिवती:- पिट्टीगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये अवैध दारू व गांजा विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे की संबंधितांना अभय मिळत आहे, अशी चर्चा परिसरात रंगली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, माथाडी गावाच्या मुख्य रस्त्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच मरकागोंदी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील परिसरातही अवैध दारू विक्री होत असल्याचा दावा केला जात आहे. नंदप्पा गावात तीन ते चार जणांकडून अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा असून आंबेझरी येथेही अशाच प्रकारची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांचा दावा आहे की, या अवैध व्यवसायांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला असूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोगस व निकृष्ट दर्जाच्या दारूमुळे अनेक दारू व्यसनी आजारी पडत असल्याचा आरोप होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. कमी वयातील युवक दारूच्या आहारी जात असल्याने पालक आणि महिलांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
महिलांनी व नागरिकांनी पिट्टीगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध दारू व गांजा विक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(टीप : वरील वृत्तातील आरोप हे स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेले आहेत. संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)



0 Comments