महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
फार्मर आयडीच्या अटीमुळे जिवती तालुक्यातील शेतकरी पिक विम्यापासून वंचित; शासनाने आधारच्या आधारे अर्जाची सुविधा द्यावी शेतकऱ्यांची मागणी
जिवती (प्रतिनिधी): जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर यंदाच्या खरीप हंगामात पिक विमा भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पिक विमा अर्जासाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा भरता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात केलेल्या चौकशीत, जिवती तालुक्यातील अनेक गावांचे सातबारा उतारे अद्याप ऑनलाइन उपलब्ध नसल्यामुळे फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सातबारा ऑनलाइन नसणे ही त्यांची चूक नसून संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत फार्मर आयडीची सक्ती करून शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही.
म्हणून जिवती तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून सातबारा ऑनलाइन होईपर्यंत आधार क्रमांकाच्या आधारे पिक विमा अर्ज स्वीकारण्याची पर्यायी व्यवस्था शासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
तसेच, स्थानिक महसूल प्रशासन, कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा केवळ तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे



0 Comments