चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*‘ते तीन पोलीस कोण?’ अन् ‘सारू’ नावाचा कथित खासगी एजंट कोण?*
*भारी पोलीस स्टेशन परिसरात चर्चेला उधाण; १५ हजार रुपयांच्या कथित वसुलीची वरिष्ठांकडून चौकशी करण्याची मागणी*
-:हकानी शेख:- चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती :- भारी पोलीस स्टेशन परिसरात सध्या एका कथित खासगी एजंटच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, ‘ते तीन पोलीस कर्मचारी कोण आणि त्यांनी सारू नावाच्या व्यक्तीला खासगी एजंट म्हणून नेमले आहे का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या चर्चेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२३ जून २०२६ रोजी एका पिकअप वाहनधारकाकडून १५ हजार रुपयांची कथित वसुली करण्यात आली असून, ही रक्कम ‘सारू’ नावाच्या कथित खासगी एजंटच्या फोन-पे खात्यावर जमा करण्यास सांगितल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, संबंधित पोलीस कर्मचारी कोण होते आणि या पैशांचा व्यवहार नेमका कोणाच्या सांगण्यावरून झाला, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, ‘सारू’ नावाचा कथित खासगी एजंट नेमका कोण? त्याचा पोलीस विभागाशी काय संबंध आहे? तसेच संबंधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे? याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.
भारी पोलीस स्टेशनचा परिसर तेलंगणा सीमेला लागून असल्याने या भागातून अवैध दारू, गांजा आणि इतर बेकायदेशीर वाहतुकीबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. चिलाटीगुडा परिसरात अवैध दारू व गांजाची विक्री होत असल्याच्या चर्चाही नागरिकांमध्ये आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित यंत्रणांनी तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
सीमावर्ती भागात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, जर पोलीस कर्मचाऱ्यांवरच अवैध वसुलीचे आरोप होत असतील किंवा खासगी व्यक्तीच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा असेल, तर या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारी पोलीस स्टेशनमधील संबंधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका, ‘सारू’ नावाच्या कथित खासगी एजंटची ओळख आणि २३ जून रोजीच्या १५ हजार रुपयांच्या कथित व्यवहाराची सखोल चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि आरोप निराधार असल्यास तेही स्पष्टपणे जनतेसमोर मांडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी आहे की अवैध धंद्यांच्या कथित वसुलीसाठी?’ असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करत असून, या संपूर्ण प्रकरणाचा वरिष्ठ अधिकारी कधी तपास करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



0 Comments