चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जिवतीत भव्य निषेध मोर्चा*
*युवक-युवती, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग*
-:हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-
जिवती:- दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ जिवती शहरात संविधानप्रेमी विद्यार्थी, युवक-युवती, तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढत तहसील कार्यालय, जिवती येथे मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी मोर्चाला संबोधित करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली.
मोर्चाच्या माध्यमातून देशातील शिक्षण व्यवस्थेत संस्थात्मक सुधारणा कराव्यात, NEET व इतर परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या नैतिक जबाबदारीचा प्रश्न उपस्थित करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच दिल्लीतील विद्यार्थी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. भारतीय संविधानातील कलम 19 अन्वये नागरिकांना प्राप्त असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन तहसीलदार, जिवती यांच्यामार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली, भारताचे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आले.
मोर्चादरम्यान संविधानिक अधिकारांचे संरक्षण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर न्याय्य चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिवती तालुक्यातील विविध घटकांनी एकत्र येत काढलेल्या या मोर्चामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



0 Comments