चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*नाव मोठे, दर्शन खोटे? प्रेमनगर गाव आजही पक्क्या रस्त्यापासून वंचित*
*भाजपची सत्ता, तालुकाध्यक्षांची ग्रामपंचायत; तरीही ग्रामस्थांना कच्च्या रस्त्यानेच जीवघेणा प्रवास*
जिवती:-जिवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे प्रेमनगर गाव आजही मजबूत व सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल अशा पक्क्या रस्त्यापासून वंचित असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. गावात जाण्यासाठी नागरिकांना कच्च्या रस्त्याचा आधार घ्यावा लागत असून, आणि घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा प्रवास अधिकच धोकादायक बनत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांच्या मते, नोकेवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असून याच ग्रामपंचायतीत सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष राहतात. मात्र, एवढे राजकीय प्रतिनिधित्व असूनही प्रेमनगर गावाच्या मूलभूत रस्त्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही,अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावात रस्त्याच्या समस्येमुळे प्रसूतीसाठी नेत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही दुर्गम गावांच्या रस्त्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रेमनगरमध्येही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत असून, "नाव मोठे, दर्शन खोटे" अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रेमनगर गावाला दर्जेदार पक्का रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून आवश्यक निधी मंजूर करावा आणि कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



0 Comments