सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सांगली व मिरजेत उत्साहात साजरी
मिरज/सांगली : सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजनांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सांगली व मिरज येथे मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. मिरज येथील हिरा हॉटेल चौक तसेच सांगली स्टँड परिसरातील भीमागण येथे आयोजित कार्यक्रमात शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
मिरज येथील कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले, तर सांगली येथील कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन महिला आघाडी आणि युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मिठाई वाटप करून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थितांनी शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, सामाजिक न्याय आणि बहुजन कल्याणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सामाजिक विषमता, अन्याय आणि भेदभावाच्या विरोधातील लढ्यात शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा आजही तितकीच महत्त्वाची आहे. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण व अधिकारांची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यांचे कार्य आणि विचार हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.
या कार्यक्रमास पवन वाघमारे (जिल्हाध्यक्ष), ऋषिकेश माने (निरीक्षक), जगदीश कांबळे (महासचिव), विनायक मोरे (सांगली शहराध्यक्ष), मनोज सनदे (सांगली शहर महासचिव), पृथ्वीराज कांबळे, हर्ष लोंढे, विजय लांडगे, डॉ. प्रियांका गायकवाड, चेतना नागवंशी, चंद्रकांत नागवंशी, स्वाती शिंदे, चंद्रकांत खरात, रुपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, सतीश शिकलगार, चंद्रकांत कांबळे, दशरथ गायकवाड, धर्मा कांबळे, अशोक कांबळे, बाबासाहेब कांबळे, संजय कांबळे, उत्कर्ष कांबळे तसेच बहुजन स्वाभिमानी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी "राजर्षी शाहू महाराजाचा विजय असो ", "जय भीम", "जय संविधान" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.



0 Comments