चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख
*नगराळा आश्रम शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शेणखताचे ढिगारे व गवताचे अतिक्रमण; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर*
*हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
जिवती:- जिवती तालुक्यातील श्री. संजय गांधी प्राथमिक आश्रम शाळा, नगराळा तसेच श्री.अंबू नाईक माध्यमिक आश्रम शाळा, नगराळा यांच्या मुख्य प्रवेशद्वारालगत शेणखताचे उखंडे, कचऱ्याचे ढिगारे आणि गवताचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच आश्रम शाळेत दि.१ सप्टेंबर रोजी दुपारच्या जेवणातून झालेल्या कथित विषबाधेच्या घटनेत ३१ विद्यार्थी बाधित झाल्याची घटना घडली होती. अशा गंभीर घटनेनंतरही शाळा परिसरातील स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजनांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे.
मुख्य प्रवेशद्वारालगत वाढलेले गवत, कचरा व शेणखताचे ढिगारे यामुळे साप, विंचू तसेच इतर विषारी जीवजंतूंचा वावर वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याची नागरिकांची चिंता आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने जारी केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी परिसर उपलब्ध करून देणे ही संबंधित संस्था व्यवस्थापन व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी मानली जाते.
त्यामुळे या प्रकरणात संबंधित संस्था व्यवस्थापन व ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन परिसराची संपूर्ण स्वच्छता, गवत निर्मूलन, कचरा व शेणखताची विल्हेवाट तसेच आवश्यक निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार की पुन्हा दुर्लक्ष होणार, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.



0 Comments