महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
प्रश्न जनतेचा, संघर्ष पत्रकारांचा आणि श्रेय मात्र ‘घरबसल्या’ कार्यकर्त्यांचे!
कामाला कार्यकर्ता गैरहजर, पण बातमीला पहिल्या रांगेत!
व्हॉट्सॲपवर तक्रारी पाठवून विकास होत नाही; त्यासाठी मैदानात उतरावे लागते!” — संपादक राहुल मसुरे
गावातील एखादे विकासकाम रखडले की काही कार्यकर्त्यांना अचानक पत्रकारांची आठवण होते. ‘या विषयावर बातमी करा’, ‘प्रशासनाचे लक्ष वेधून घ्या’, ‘विकासकाम झाले नाही, अशी बातमी लावा’ असे संदेश पत्रकारांच्या व्हॉट्सॲपवर धडकू लागतात. पत्रकारही जनहिताचा विषय समजून बातमी प्रसिद्ध करतात. प्रशासन दखल घेते, अधिकारी हालचाल करतात आणि रखडलेले काम मार्गी लागते.
पण त्यानंतर सुरू होतो श्रेयवादाचा खेळ!
ज्या कामासाठी संबंधित कार्यकर्ता स्वतः कधी ग्रामपंचायतीच्या दारात गेला नाही, अधिकाऱ्यांना निवेदन दिले नाही, नागरिकांना सोबत घेतले नाही, आंदोलन केले नाही किंवा सातत्याने पाठपुरावा केला नाही, तोच काम पूर्ण झाल्यानंतर गावभर सांगतो—‘हे काम मी करून घेतले!’
म्हणजे बातमी काढण्याचे काम पत्रकारांचे, प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकारांचे आणि श्रेय घेण्याचे काम मात्र कार्यकर्त्यांचे!
ही केवळ पत्रकारांची फसवणूक नाही; तर जनतेच्या विश्वासाशीही खेळ आहे.
काही जण तर विद्यमान पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात विकासकामांवर बातम्या लावण्यासाठी पत्रकारांना प्रवृत्त करतात. स्वतः मात्र प्रत्यक्ष संघर्षापासून दूर राहतात. कारण त्यांना प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्नाचे राजकीय भांडवल करून पुढील निवडणुकीसाठी स्वतःची प्रतिमा तयार करण्यात अधिक रस असतो.
याहून गंमतीची बाब म्हणजे एखाद्या वाढदिवसानिमित्त चार-पाच गरजू व्यक्तींना वस्तूंचे वाटप करायचे आणि त्यासाठी अनेक पत्रकारांना फोन करून ‘बातमी लावा’ अशी विनंती करायची. मदत किती झाली यापेक्षा फोटो किती छापून आला, याला महत्त्व दिले जाते. ही समाजसेवा आहे की प्रसिद्धीचा कार्यक्रम, हा प्रश्न जनतेनेच विचारायला हवा.
पत्रकारांनीही आता अशा प्रकारांना बळी पडणे थांबवले पाहिजे.
व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज बातमी नसतो. प्रत्येक आरोप बातमी नसतो. प्रत्येक छोटा उपक्रम प्रसिद्ध करण्यासारखा नसतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रकार कोणाच्याही राजकीय प्रतिमा निर्मितीचे साधन नाहीत.
पत्रकारितेचे काम एखाद्या कार्यकर्त्याचे नाव मोठे करणे नाही; तर जनतेचा प्रश्न मोठा करणे आहे.
खरोखरच एखाद्या कार्यकर्त्याने जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष केला असेल, प्रशासनाकडे पाठपुरावा केला असेल, नागरिकांना संघटित केले असेल आणि त्यातून सकारात्मक परिणाम घडवून आणला असेल, तर त्याच्या कार्याची बातमी नक्कीच झाली पाहिजे. पण केवळ पत्रकारांकडून बातम्या करून घेऊन, प्रशासनाने काम केल्यानंतर त्याचे श्रेय स्वतःच्या खात्यात जमा करणाऱ्यांना पत्रकारांनी प्रसिद्धी देण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.
कारण पत्रकारिता ही कुणाच्या पुढच्या निवडणुकीची तयारी नाही.
आज एखाद्याच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी पत्रकारितेचा वापर केला, तर उद्या पत्रकारितेवरील जनतेचा विश्वासच कमी होईल.
म्हणून पत्रकारांनी एक साधा नियम ठरवण्याची वेळ आली आहे—
‘बातमी जनहिताची असेल तर नक्की प्रसिद्ध करू; पण कोणाचे राजकीय वजन वाढवण्यासाठी पत्रकारितेचा वापर होऊ देणार नाही.’
ज्यांना खरोखर समाजासाठी काम करायचे आहे, त्यांनी व्हॉट्सॲपवर बातम्या मागण्यापेक्षा मैदानात उतरावे.
कारण समाजसेवक तो नाही, जो प्रत्येक कामाचे श्रेय घेतो; समाजसेवक तो आहे, जो काम करून झाल्यावरही श्रेयाच्या रांगेत सर्वांत पुढे उभा राहत नाही.
पत्रकारांची लेखणी समाजाच्या प्रश्नांसाठी आहे—कुणाच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी नाही!



0 Comments