चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जिवतीतील पीएमकेएसवाय कामांवर भ्रष्टाचाराचा संशय; विभागीय चौकशीच्या मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे धाव*
*चौकशी न झाल्यास अनोख्या आंदोलनाचा इशारा; कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी*
-:हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-
जिवती:- दि.८ सप्टेंबर : जिवती तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत सन २०२६ मध्ये करण्यात आलेल्या माती नाला बांध व अनगड दगडी बांध कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिवती तालुका अध्यक्ष हकानी शेख यांनी या कामांची विभागीय चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, यापूर्वी दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी, जिवती यांना याच विषयावर सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याने दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी स्मरणपत्र सादर करण्यात आले. संबंधित कामांची चौकशी करून झालेल्या कारवाईचा अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे संबंधित माती नाला बांध व अनगड दगडी बांध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण झाल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच, तालुका कृषी अधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त करण्यात आला असून, हा आरोप निवेदनकर्त्यांचा आहे.
जिल्हा कृषी अधीक्षकांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात धोंडा मांडवा, कुंभेझरी (गट क्र. १, २, ३, ४ व ५), शेडवाई (गट क्र. १, २, ३, ६ व ७), नार पठार (गट क्र. १), कोदेपूर (गट क्र. १ ते ८) येथील माती नाला बांध कामे तसेच कोदेपूर व नोकेवाडा येथील अनगड दगडी बांध कामांची विभागीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, संबंधित निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई करून त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करावे, कामाची देखरेख करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हकानी शेख यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, संबंधित कामांची निष्पक्ष विभागीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे निवेदनकर्त्यांनी केलेले असून, त्यांची सत्यता सक्षम विभागीय चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



0 Comments