चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
नगरपरिषदेच्या 2 लाखांच्या वित्तहानीची भरपाई कोण करणार?
स्वीकृत नगरसेवक सचिन भोयर यांचा सवाल
नगरपरिषदेच्या पदाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ₹72 लाख 13 हजार 787 रुपयांच्या कामाला स्थगिती देऊन ते काम रद्द करण्याची मागणी स्वीकृत नगरसेवक सचिन भोयर यांनी केली होती. शहरातील प्रलंबित असलेली पाणीपुरवठा, फुटलेल्या नाल्या, रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
भोयर यांच्या मागणीनुसार आज झालेल्या विशेष सभेत ₹72 लाख 13 हजार 787 रुपयांचे कार्यालय नूतनीकरणाचे काम रद्द करून ही तरतूद पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी वळविण्यात आली आहे. नवीन पाइपलाइन, बोअरवेल तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे.
विशेष सभेत बोलताना सचिन भोयर म्हणाले, “नगरपरिषद कोणतेही काम करत असताना दूरदृष्टीकोन ठेवून नियोजन करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. एखादे काम मंजूर केल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर ते काम रद्द करण्यासाठी पुन्हा विशेष सभा घ्यावी लागते. त्यामुळे भविष्यात कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्याचा नागरिकांना होणारा फायदा आणि आर्थिक परिणाम यांचा विचार करणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, काम मंजूर झाल्यानंतर त्यासाठी ड्रॉइंग तयार करणे, आर्किटेक्टची नियुक्ती करणे, आर्किटेक्टची फी, बांधकाम विभागाकडे 1.25 टक्के शुल्क भरून तांत्रिक मान्यता घेणे, तसेच वर्तमानपत्र आणि ऑनलाइन पोर्टलवर निविदेची जाहिरात करणे, अशा विविध प्रक्रियांवर नगरपरिषदेचा खर्च होतो. या प्रक्रियेमध्ये जवळपास ₹ 2 लाख रुपये तांत्रिक शुल्कासह खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदाराचा खर्च झालेला असल्यास आणि संबंधित ठेकेदाराने न्यायालयात दाद मागितल्यास त्याची भरपाई नगरपरिषदेला करावी लागू शकते, अशी शक्यताही भोयर यांनी व्यक्त केली.
“एका कामाचा निर्णय घेताना दूरदृष्टीचा अभाव राहिल्यामुळे आज नगरपरिषदेवर विनाकारण आर्थिक भार पडला आहे. हा पैसा नगरपरिषदेचा नसून जनतेच्या करातून जमा झालेला पैसा आहे. नागरिकांनी कर वेळेवर भरला नाही तर त्यांच्याकडून व्याज आकारले जाते. मग जनतेच्या पैशाचे अशा प्रकारे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल सचिन भोयर यांनी उपस्थित केला.
“या संपूर्ण प्रक्रियेमुळे झालेल्या वित्तहानीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून भरपाई वसूल करण्यात यावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध निधीचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर व्हावा, अशी भूमिका सचिन भोयर यांनी यावेळी मांडली.



0 Comments