सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
*बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी*
सांगली : बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा विविध सामाजिक, शैक्षणिक व धम्ममय उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दि. 29 एप्रिल 2026 रोजी इयत्ता 5 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 30 विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना धम्म, संस्कार, शिस्त, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक जाणिवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 30 एप्रिल रोजी श्रावस्ती विहार येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रज्ञा, करुणा व मानवतेचा संदेश देणाऱ्या या दीपोत्सवाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणाचा सोहळा विशेष पद्धतीने पार पडला. मनपा कर्मचारी, भोजन तयार करणारे आचारी तसेच महिला भगिनी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कष्टकरी हातांचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न होता.
यानिमित्त रमाई उद्यान ते भीमागण परिसर अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर सनद पवार सर यांनी “मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्ध आणि त्यांचा धम्म” या विषयावर उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, “राग आल्यावर मन अस्थिर होते, पण शांत विचार आणि संयम ठेवला तर निर्णय योग्य होतात. बुद्धांचा धम्म माणसाला अंधश्रद्धेपेक्षा विचार करायला शिकवतो.” तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील ताणतणाव, भीती, राग आणि स्पर्धा यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बुद्धांच्या विचारांचा कसा उपयोग होऊ शकतो, हे सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितले.
कार्यक्रमानंतर अरुण कांबळे सर यांच्या हस्ते “शिवाजी कोणी होता?” या पुस्तकाच्या 70 प्रती उपस्थितांना वाटप करण्यात आल्या. वाचन संस्कृती आणि इतिहासाचा चिकित्सक अभ्यास वाढावा हा यामागील उद्देश होता.
त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन व्यवस्थेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आयोजकांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी उपासक, उपासिका, बालक तसेच बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— आयोजक
*बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली*



0 Comments