सांगली जिल्हा प्रतिनिधी उषा कांबळे
✊ पट्टणंकोडोली येथे ९ मार्च जनआंदोलन नियोजन बैठक संपन्न
हजारोच्या संख्येने भीमसैनिक मोर्चास जाण्याचा निर्धार
पट्टणंकोडोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे एस. सी. समाजाची भव्य नियोजन बैठक उत्साहात आणि निर्धाराने पार पडली. ९ मार्च रोजी होणाऱ्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत प्रथमच एस. सी. समाजातील विविध घटक जाती — मातंग, चर्मकार, खाटिक, बौद्ध व इतर समाज बांधव — एकत्र येत हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
ही बैठक केवळ नियोजनापुरती मर्यादित नव्हती; ती अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या लढ्याची शपथ होती. उपस्थित प्रत्येकाच्या मनात अन्यायाविरुद्ध तीव्र संताप आणि हक्कांसाठी झगडण्याची जिद्द स्पष्ट दिसत होती.
जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी मार्गदर्शन करताना ठाम शब्दांत भूमिका मांडली. ते म्हणाले, “हा लढा आपल्या अस्मिता आणि अस्तित्वासाठी आहे. जर प्रस्थापित भांडवलशाही नेते प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या आरक्षण हक्कांवर चुकीच्या पद्धतीने घाला घालत असतील, तर ही नीच प्रवृत्ती गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” त्यांच्या या जाज्वल्य शब्दांनी उपस्थित भीमसैनिकांच्या अंगात नवा जोश संचारला.
बाबासो कांबळे यांनी सर्व समाजबांधवांना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आवाहन केले. ९ मार्च रोजी मोठ्या संख्येने जनआंदोलनात सहभागी होऊन आपली ताकद दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रमेश जाधव सर यांनी इतिहासाचे दाखले देत उपस्थित बांधवांना प्रेरित केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा आपल्या रक्तात आहे. “जर कुणाला सत्तेची मस्ती आली असेल तर ती मस्ती आम्ही उतरवू. ३०% ताकद काय करू शकते हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ,” असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.
ॲड. भीमसेन राजमाने यांनी कायदेशीर लढ्याची दिशा स्पष्ट केली. जातपडताळणी हरकत आणि बोगस दाखल्यांविरोधात कायदेशीर पाठपुरावा करून सत्य न्यायालयात सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी रस्त्यावरचा संघर्ष आणि न्यायालयीन लढा दोन्ही समान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
अनिल कांबळे यांनी पूर्ण ताकदीने आंदोलनात उतरून सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
अंबर बनगे यांनी प्रथमच एस. सी. समाजातील सर्व घटक जाती एकत्र येत असल्याचा अभिमान व्यक्त केला. मातंग, चर्मकार, बौद्ध, खाटिक व इतर समाज एकत्र येणे हीच आपल्या लढ्याची खरी ताकद असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे स्वागत केले.
शेवटी भीमराव संघमित्रा सर यांनी आभार प्रदर्शन करत हा मोर्चा मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
ही बैठक म्हणजे एका नव्या संघर्षाची सुरुवात आहे. अन्याय सहन करणार नाही, हक्कांवर घाला घालू देणार नाही आणि अस्मिता व अस्तित्वासाठी अखंड लढा देऊ — असा निर्धार सर्वांनी एकमुखाने केला.
९ मार्च रोजी हजारो भीमसैनिक रस्त्यावर उतरून आपल्या स्वाभिमानाचा हुंकार बुलंद करण्यास सज्ज झाले आहेत.
जय भीम! ✊🔵



0 Comments