*पाटागुडा येथीलआदिवासी महिलांना पुलाची अडकाठी डिलिव्हरी साठी दुसऱ्या गावात एक महिन्यापासून स्थलांतर*
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:-जिवती तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा पाटागुडा हे गाव 30ते 40 घरांची वस्ती असणारे 100% आदिवासी बांधव राहणारे महसुली गाव आहे. या गावाला गेल्या अनेक वर्षापासून पुलाची मागणी आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले परंतु बांधकाम हे अपूर्ण केले असल्यामुळे नाल्याचा प्रवाह मोठा व पूल लहान अशा स्वरूपाच्या कामामुळे यावर्षीच्या झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्णता पूल वाहून गेल्यामुळे या गावाचे जाणे- येणे बंद झाले आहे. रस्त्यावरील पुलच वाहून गेल्यामुळे गावातून बाहेरगावी शाळेसाठी जाणारे विद्यार्थी, गावकरी दर महिन्याला जाणारे पेन्शनधारक,वयोवृद्ध, म्हातारे व सामान्य नागरिकांनाही गावातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. गावकऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बऱ्याचदा या संदर्भातील पत्रव्यवहार, निवेदने प्रशासनाला दिले असले. तरी प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात या गावाकडे लक्ष न देता दुर्लक्षच केलेले आहे. सध्या प्रशासनाचा काळ असून अधिकारी कर्मचारी हेच ' चालक-मालक ' झाले असल्याने त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसल्याने अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे फावते झाले आहे. त्यामुळे या रस्त्याकडे व पुलाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे त्याचाच फटका गावातील चार महिला या गरोदर असून त्यांना वेळोवेळी तपासणी करणे. आरोग्यासाठी दवाखान्यात जाणे येणे करावे लागते परंतु पूलच वाहून गेला असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन गावामधून बाहेर निघत नाही व बाहेरून गावाकडे जात नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये. व गरोदर महिलांना डिलिव्हरी साठी वेळेवर धावपळ होऊ नये. यासाठी एक महिन्यापासून चार महिला जवळच असलेल्या दोन किलोमीटर अंतरावरील जांभूळधरा (शेरकीगुडl)या गावी सौ पार्वताबाई सीत्रू जुमनाके, बाकूबाई केशव कोडापे , रेश्मा गोसाई जुमनाके, करिष्मा लिंबाराव कुमरे, या महिला नातेवाईकाच्या इथे एका पडक्या घरामध्ये राहतात स्वतःची घरदारे असून सुद्धा त्यांना आरोग्यासाठी दुसऱ्या गावात रूम करून गाव सोडून कुटुंब सोडून राहण्याची वेळ या महिलावर आली. असल्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा होत असला. तरी सरकार एकीकडे लाखो करोड रुपये आदिवासी बांधवांसाठी खर्च करीत असल्याचा कांगावा जरी करत असले? तरी मात्र मूलभूत अत्यावश्यक सुविधांपासून आदिवासी बांधवांना वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असल्यामुळे आजही जिवंतपणीच नरक यातना सोसाव्या लागणाऱ्या या महिलांची व्यथा ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. असे सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश मडावी यांनी प्रतिनिधी जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेव्हा आता तरी प्रशासनाने याचे गांभीर्य घेऊन या पुलाचे तात्काळ बांधकाम करावे अन्यथा गावकऱ्यांनाच स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
"पूल तुटल्यामुळे आम्ही इथे रूमवर राहतो डिलिव्हरीत काही अडचण येऊ नये आली तर इथून वाहन मिळू शकते म्हणून गाव सोडून इथे राहतो." सौ पार्वताबाई सीत्रू जुमनाके गरोदर महिला.
"पूलाची उंची कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे पण त्यावेळेस इस्टिमेट त्या पद्धतीचे असल्यामुळे झाले असेल सध्या मी इंजिनियर च्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराला सांगून तात्पुरती व्यवस्था करून द्यायला लावतो." श्री एस.सयाम उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोरपणा



0 Comments