*जिवती तालुक्यातील मौल्यवान सागवानाची अवैधरित्या तेलंगणात तस्करी*
*वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का?*
""
जिवती:-मौल्यवान सागवान व खनिज संपत्ती साठी महाराष्ट्रात ओळख असलेल्या जिवती तालुक्यात मोठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी केली जात आहे. वनपरिक्षेत्र जिवती अंतर्गत येत असलेल्या शेणगाव वन उपक्षेत्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून याला स्थानिक वनविभागाची मुकसंमती असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सागवान तस्करांना वनाची लुट करण्यासाठी रान मोकळे करण्यात आले अशी पण चर्चा जोमात सुरू असून संबंधित वन कर्मचारी सागवान तस्करा सोबत हात मिळवून कोमात गेल्याची चर्चेला उधाण आले आहे. याकडे वरिष्ठांच्या दुर्लक्ष म्हणावे का आशीर्वाद म्हणावे असे कोडे उपस्थित झाले आहे? वनाचे रक्षकच वनाचे भक्षक बनले तर सागवान तस्करी कशी थांबणार?
दि.८ सप्टेंबर रोजी शेणगाव वन उपक्षेत्रातील राहपल्ली,बुध्दगुडा शिवारातुन सागवान वृक्षतोड करून लाकडाचे ओंडके भरलेला वाहन तेलंगणाकडे जात असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी तस्करांसोबत हातमिळवणी करून मोठी रक्कम व गावठी कोंबड्यावर समझोता करून दुसऱ्या ट्रॅक्टरने लाकडे वन कार्यालयात आणून लावारिस सागवान असल्याचा कांगावा केला अशी चर्चा शेणगाव परिसरात सुरू आहे. प्रश्न इथे उपस्थित होत आहे की सागवान भरलेले वाहन कोणाचे होते. किंवा ज्या ट्रॅक्टरने सागवानाची ओंडके आणले तेच वाहन तर नसणार ना? उगाच देखावा करून त्या ट्रॅक्टर वाल्यांना वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी ही युक्ती तर लढवली नसणार ना? दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सागवानाच्या ओंडक्याची संख्या जास्त होती परंतु कमी दाखविण्यात आली. याचे मागचे कारण काय असू शकते ही पण चर्चा होत आहे. सागवानाचे ओंडके जप्त केले परंतु जुन्या जप्त केलेल्या लाकडामध्ये मिसळून ठेवण्यात आले त्याचे कारण काय असू शकते? विचार करायची बाब आहे.
शेणगाव नियतक्षेत्रातील घनपठार शिवारातुन दर आठवड्याला मॅक्स पिक अप वाहनाने सागवानाची तस्करी होत असल्याचे परिसरात चर्चा सुरू असून.
अवैधरित्या होणऱ्या सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर चिखली ( खु ) येथे वन विभागाने तपासणी नाका उभारला आहे मात्र गेल्या आठवड्यात अवैध सागवान भरलेल्या वाहनाने तपासणी नाक्यावरील बॅरिगेट्स तोडून वाहन पळविल्याचे वन कर्मचाऱ्याने स्वतः कबुल केले.
यावरून सागवान तस्करीला घेऊन वन कर्मचारी किती गंभीर आहेत हे दिसून येते.
एकीकडे वन विभाग ' एक पेड मां के नाम ' उपक्रम राबवतो तर दुसरीकडे तस्करांना मोकळे रान.असा आरोप केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते अवैध सागवान तस्करीत वन कर्मचारीच गुंतले असल्याचे बोलले जात आहे, कर्मचाऱ्यांच्या अशा भुमिकेमुळे कुंपणच शेत खाते असे म्हणण्यास हरकत नाही,शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊनही भागत नसल्यासारखे वन कर्मचारी अवैध सागवान तस्करीला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी केल्यास या सागवान तस्करी मध्ये कोण -कोणत्या वन कर्मचाऱ्याने खिसे गरम केले असेल ती बाब समोर येऊ शकते.



0 Comments