चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी हानिशा दुधे
खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश; गोल पुलियाची वाहतूक समस्या लवकरच सुटण्याच्या मार्गावर
रेल्वे आणि नगर परिषद प्रशासनाची संयुक्त पाहणी; लवकरच सुधारित कामाला सुरुवात होण्याची शक्यता
बल्लारपूर : नागपूर-काझीपेठ तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे बल्लारपूर शहरातील बस्ती परिसरातील ‘गोल पुलिया’चा विस्तार करण्यात आला. मात्र, या बांधकामामुळे मागील दोन वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आता प्रशासनाकडून त्यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नगर परिषद प्रशासनाने स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार २८ सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गोल पुलिया परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधला आणि समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.
खासदारांच्या सूचनेची दखल घेत मंगळवारी दुपारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विशेष पथक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोल पुलिया परिसराची संयुक्त पाहणी केली. यावेळी रेल्वेचे कार्यकारी अभियंता दिलीप सेलूकर, उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य, बांधकाम सभापती अब्दुल करीम शेख, पाणीपुरवठा सभापती इस्माईल ढकवाला, ज्येष्ठ नगरसेवक भास्कर माकोडे, बांधकाम विभागाचे मयूर दहीकर, कृष्णा गुलहाने, प्रणय वाटेकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी संदीप चौहान, खासदार प्रतिनिधी शेगावकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
पाहणीदरम्यान रेल्वे व नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गोल पुलियाची सद्यस्थिती, वाहतुकीची अडचण तसेच नागरिकांना निर्माण होणाऱ्या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधण्यात आला.
आगामी नवरात्री आणि दिवाळी सणांच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेत दिवाळी सण संपल्यानंतर गोल पुलाच्या सुधारित कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तांत्रिक व प्रशासकीय बाबींची तपासणी करून या समस्येवर कायमस्वरूपी योग्य तोडगा काढला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली गोल पुलियाची वाहतूक व रस्त्याची समस्या आता मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडल्याने बल्लारपूरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.



0 Comments