जिवती तालुका प्रतिनिधी गोविंद गोरे
धनगर आरक्षणासाठी जिवतीत एल्गार! मुख्यमंत्री यांना निवेदन; ‘प्लॅन बी’सह ठोस कायदेशीर लढ्याची मागणी
जिवती : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, जिवती तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, जिवती यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या विशेष अनुमती याचिकेच्या पार्श्वभूमीवर शासनाने धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि कायदेशीर बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करावे, तसेच या प्रकरणासाठी सक्षम व अनुभवी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय झाल्यास समाजाला एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशीही ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
याशिवाय श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, देवस्थानाच्या विश्वस्त मंडळात किमान २१ विश्वस्त असावेत आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीस द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘Missing Link’ला स्वातंत्र्यवीर शिंग्राबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय धनगर रक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पोले, उपाध्यक्ष शिवाजी श्रीरामे, ज्येष्ठ नेते माधव डोईफोडे, नागोराव देवकते, नागनाथ बोरुळे, गोविंद गोरे, राम आमनर, सूरज शेंडगे, बालाजी करले, नामदेव सलगर, रामेश्वर देवकते, परमेश्वर देवकते, खंडुजी सलगर, आकाश माने, माधव फुगनर, शंकर देवकते, मालू पोले, बालाजी पांढरे, कृष्णा पोले, बालाजी बोळगीर, सिद्धेश्वर सलगर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.



0 Comments