Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

२० जणांनी पेटवली विकासाची मशाल; महापांढरवाणीत श्रमदानाची चळवळ २०० पार! अकराव्या आठवड्यात बांबू लागवड; वनसंवर्धनासोबत गावातच रोजगाराचा ग्रामस्थांचा निर्धार

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

२० जणांनी पेटवली विकासाची मशाल; महापांढरवाणीत श्रमदानाची चळवळ २०० पार!

अकराव्या आठवड्यात बांबू लागवड; वनसंवर्धनासोबत गावातच रोजगाराचा ग्रामस्थांचा निर्धार

महापांढरवाणी, ता. जिवती : शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावकऱ्यांनीच हातात हात घालून सुरू केलेल्या श्रमदान चळवळीने महापांढरवाणीत ग्रामविकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या २० ग्रामस्थांपासून सुरू झालेला हा उपक्रम आता २०० हून अधिक ग्रामस्थांच्या सहभागापर्यंत पोहोचला आहे.

अकराव्या आठवड्यात ग्रामस्थांनी घनदाट जंगल परिसरात बांबू लागवड व वृक्षसंवर्धनाचे काम केले. वृक्षलागवड, बांबू लागवड, बांबूच्या थावड्या तयार करणे आणि वृक्षरक्षण बंधन अशा विविध उपक्रमांतून गावकऱ्यांनी वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ग्रामसभेचा CFR क्षेत्रासाठी ठोस निर्णय

लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी बाराव्या आठवड्यात कंपाऊंड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण CFR क्षेत्राला कंपाऊंड करण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केला असून, याबाबत सामूहिक वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

श्रमाला रोजगाराची जोड देण्याची मागणी

वनसंवर्धनासाठी ग्रामस्थ श्रमदान करीत असले तरी या श्रमाला रोजगाराची जोड मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत येरमी-येसापूरचे ग्रामसेवक श्री. नगराळे व रोजगारसेवक श्री. केशव कुमरे यांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.

मुख्याध्यापक श्री. लिंगोराव सोयाम यांनी VB-G RAM G योजनेतून रोजगार मिळविण्यासाठी कामाची मागणी अर्जाद्वारे करण्याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ समाजसेवक व पेसा अभ्यासक श्री. संतोषजी सलाम यांनी योजना, ग्रामसभेची भूमिका आणि वनसंवर्धनातून रोजगारनिर्मिती याबाबत मार्गदर्शन केले.

“श्रमदान आम्ही करू; शासनाने आमच्या हाताला काम द्यावे!” असा ठाम संदेश महापांढरवाणी ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments