चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*शेणगाव PHC मध्ये डॉक्टरांसह १० पदे रिक्त; आदिवासींच्या आरोग्याशी खेळ थांबवा, अन्यथा आंदोलन!*
जिवती:- जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यासह विविध महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायत शेणगाव, ग्रामपंचायत सोरेकसा आणि पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कटारे यांना संयुक्त निवेदन देऊन रिक्त पदे तात्काळ भरण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, वैद्यकीय अधिकारी १, औषध निर्माण अधिकारी १, परिचर २, आरोग्य सेवक २, सुमन योजना अंतर्गत अधिपरिचारिका २ तसेच उपकेंद्र कुंभेझरी व टेकामांडवा येथे प्रत्येकी १ आरोग्य सेविका अशी एकूण १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून अनेकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, "रिक्त पदे तात्काळ भरावीत; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या वेळी उपसरपंच नरसिंग हमणे, सदस्य नंदाताई मुसने, सदस्य अजय तिरणकर, मनसे तालुकाप्रमुख हकानी शेख, भाजप कार्यकर्ते प्रेमदास राठोड, अजय खंदारे, मिथुन लांडगे, नाशिक कपाळे, माधव कांबळे, सोरेकसा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर कोटनाके, देविदास खंदारे तसेच पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्राचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीदार उपस्थित होते.



0 Comments