सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
संजयनगर पोलीस ठाण्याचा कारभार संविधानानुसार चालवावा : दीपक माने
नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत; गुन्हेगारी व नशेखोरी मोडून काढण्याचे आवाहन
सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असलेली नशेखोरी आणि गुन्हेगारी कोणत्याही पक्ष, जात अथवा धर्माचा विचार न करता कठोरपणे मोडून काढावी. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण करून संजयनगर पोलीस ठाण्याचा कारभार भारतीय संविधानातील कायद्याच्या चौकटीत चालवावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांनी केली.
संजयनगर पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्त संजयनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांनी कुरळे यांचे संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत केले.
गेल्या काही काळापासून संजयनगर परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिक नेते, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नशेखोरांनी परिसरात धुमाकूळ घालत नागरिकांच्या मालमत्तेची तोडफोड केली तसेच महिलांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी कर्तव्यदक्ष अधिकारी बयाजीराव कुरळे यांची नियुक्ती केली आहे.
यावेळी दीपक माने म्हणाले, “परिसरातील नशेखोरी आणि गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी प्रामाणिक आणि प्रभावी पोलीसिंग करावे. जनतेवरील अन्याय व त्रास दूर करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत कठोर पावले उचलावीत. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या या कार्यात संजयनगरची जनता पोलीस प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
या स्वागतप्रसंगी रवींद्र ढगे, हमाल नेते किरण रूपनर, संजयजी बंजत्री, राजू कांबळे, महेश शिंदे, अजित वडर यांच्यासह संजयनगर परिसरातील नागरिक व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments