महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
जिवती तालुक्यात रानभाज्या व तेलबिया महोत्सव उत्साहात संपन्न
उत्सवात शेतकरी व महीला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
जिवती : स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिकता तसेच तेलबिया पिकांचे उत्पादन व त्यातून मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिवती तालुक्यात रानभाज्या व तेलबिया महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या महोत्सवात तालुक्यातील कृषी सखी, कृषी ताई तसेच उमेदच्या कृषी सखींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विविध रानभाज्या, तेलबिया पिके आणि त्यांचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. महिलांचा सक्रिय सहभाग हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी माधुरी गावडे मॅडम होत्या. आत्मा तालुका सल्लागार समितीचे तालुका अध्यक्ष व शिवसेना तालुका अध्यक्ष भरत बिरादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच समिती सदस्य व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप काळे, उपतालुका कृषी अधिकारी केळकर साहेब व ढाकणे साहेब, अंबुजा फाउंडेशनचे पानघाटे सर, उमेदचे ब्रांच मॅनेजर श्री. उद्धव मडावी, पाणी फाउंडेशनच्या श्रीमती सविता पेटकर, बीटीएम किशोर चांदणबटवे सहाय्यक कृषी अधिकारी सिद्धेश्वर गेडाम . तंत्र सहाय्यक सुमित घुले तसेच तहसीलदार श्रीमती रूपाली मोगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक अन्नपद्धतीचे जतन, तेलबिया पिकांना प्रोत्साहन आणि महिलांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
रानभाज्या आणि तेलबिया या केवळ पारंपरिक वारशाचा भाग नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे महत्त्वाचे साधन आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व महिलांना स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग, आत्मा, उमेद, पाणी फाउंडेशन, अंबुजा फाउंडेशन तसेच सहभागी कृषी सखी व कृषी ताईंचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.



0 Comments