जिवती तालुक्यात चहाचा अगोदर दारूचा घोट, गांजाचा दम!
प्रशासनाचे दुर्लक्ष युवा पिढी व्यसनाच्या दरीत!
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:- तालुक्यात दारूबंदीचे व इतरही नशेली पदार्थाचे कायदे फक्त कागदावर राहिले आहेत. प्रत्यक्षात मात्र सूर्योदयाआधीच गावागावांत दारूची दुकाने, गुप्त अड्डे आणि चढाओढीने चालणारा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे.गांजाही सहजपणे गावा- गावात मिळत आहे. सूर्योदयापूर्वीच अवैध दारू विक्रेत्याच्या दरबारासमोर मद्यपी दिसतात, एक फोन करा आणि दारू गांजा मिळवा अशी सर्विस अवैध धंदे करणारे ग्राहकाला सहज उपलब्ध करून देत आहे प्रशासन मात्र डोळेझाक करून झोपलेले आहे.
गावातील युवापिढी या सुळसुळाटात सर्वाधिक ओढली जात आहे.शिक्षण, नोकरी, रोजगार, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, देशाच्या सेवेत अग्रेसर असायला पाहिजे मात्र यापासून दूर तरुणांचा मोठा वर्ग व्यसनाकडे वळत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पालकांच्या डोळ्यांतले स्वप्न दारूच्या ग्लासात बुडत आहे व गांजा सारख्या नशीली पदार्थांच्या झुरक्यात उडत आहे.
""बापाच्या खांद्यावर लेकरांची प्रेतं, तरीही अवैध दारू विकणारे गावा-गावात जबाबदार कोण?"
दारूच्या नशेतून होणारे अपघात, आत्महत्या आणि घरगुती कलह भांडण हे नित्याचे झाले आहेत. एखाद्या तरुणाचे अकाली निधन झाले की त्याची चिता पेटते, पण गावाच्या मध्यभागी दारूचे अड्डे मात्र अजून पेटतच राहतात. प्रशासन, पोलिस व दारू माफिया यांच्यातील संगनमताची चर्चा गावागावांत सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसापासून ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनात व्यसन मुक्त समाज, व्यसन मुक्त युवापिढी घडावे यासाठी प्रयत्न केले जात आहे, जिवती पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर लहान- मोठ्या कारवाई होत आहेत मात्र अवैध दारू विक्रेत्याला याचा फारसा फरक होताना दिसत नाही.
*प्रशासनाचा अदृश्यपणा:*
ज्या ठिकाणी दारू विक्रीवर स्पष्ट बंदी आहे, त्याच ठिकाणी उघडपणे व्यवहार सुरू असल्याने "अधिकाऱ्यांच्या खिशात हप्ते जातात का?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सामान्य जनतेची मागणी:-
अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ धडक कारवाई व्हावी.
गावागावांत पोलिस गस्त वाढवावी.राजकीय नेते तसेच सामाजिक संघटनांनी दारू माफियांना धडे शिकवावे
( जिवती तालुक्यात अवैध दारू, अवैध गांजाचा सुळसुळाट रोखला नाही, तर पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात जाणार हे निश्चित आहे.यासाठी प्रशासनाने झोपेतून उठून कठोर पावले उचलण्याची नितांत गरज आहे.अन्यथा युवा शिक्षीत पिढी क्राईम कडे वळू शकते यामुळे भविष्यात गुन्हेगारी वाढ होण्यास वेळ लागणार नाही परिस्थिती बेकाबू होऊन जीवनाचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही हे मात्र तेवढेच खरे.



0 Comments