चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
सेवा संकल्प अभियानांतर्गत व्यसनमुक्ती सप्ताहाची जनजागृती रॅली उत्साहात
“नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान”चा संदेश; नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
चंद्रपूर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच जनहिताय मंडळ आणि जय हेल्थ एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित झेप व झेप नई दिशा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, बाबुपेठ, चंद्रपूर यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत व्यसनमुक्ती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत उपस्थितांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला.
“नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान” या घोषवाक्याला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली. दारू व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनाधीन व्यक्तींनी योग्य वेळी उपचार व समुपदेशनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
रॅलीदरम्यान नागरिकांना व्यसनमुक्तीविषयक माहिती असलेली पत्रके वितरित करण्यात आली. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश व घोषणांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच ट्रॅक्टरवर आकर्षक पोस्टर्स व व्यसनमुक्तीविषयक माहितीचे प्रदर्शन करण्यात आले होते. व्यसनामुळे आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या परिणामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
दारूचे व्यसन ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित समस्या नसून त्याचा परिणाम कुटुंब आणि समाजावरही होतो. योग्य समुपदेशन, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि कुटुंबीयांचा आधार मिळाल्यास व्यसनाधीन व्यक्ती पुन्हा सामान्य व सन्मानाचे जीवन जगू शकते, असा सकारात्मक संदेश रॅलीतून देण्यात आला.
जनजागृती रॅलीची सुरुवात महात्मा गांधी चौक येथून करण्यात आली. विविध घोषणांसह रॅली जटपुरा गेट येथे पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प व्यक्त करत रॅलीची सांगता करण्यात आली.
या उपक्रमात झेप व झेप नई दिशा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रातील कार्यकर्ते, कर्मचारी, आंतररुग्ण तसेच बाह्यरुग्ण मित्रांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः व्यसनमुक्तीच्या प्रवासात असलेल्या आंतररुग्ण व बाह्यरुग्णांनी स्वतः पुढाकार घेत जनजागृतीच्या कार्यात सहभाग नोंदविला. “स्वतः व्यसनमुक्त होण्यासोबत इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करणे” हा संदेश त्यांच्या सहभागातून देण्यात आला.
व्यसनाधीन व्यक्तींना तिरस्काराने नव्हे, तर सहानुभूती, समजूतदारपणा आणि उपचारांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. व्यसनमुक्त व्यक्ती, सक्षम कुटुंब आणि निरोगी समाज हीच विकसित भारताच्या दिशेने वाटचाल असल्याचा संदेश देत व्यसनमुक्ती सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार!”
“व्यसनमुक्त व्यक्ती सक्षम कुटुंब समृद्ध समाज!”



0 Comments