चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
झेप नई दिशा दारूमुक्ती केंद्राचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात
‘व्यसन ही सवय नसून आजार आहे’ — डॉ. एस. एस. पालीवाल
चंद्रपूर जय हेल्थ एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरद्वारा संचालित झेप नई दिशा दारूमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, चंद्रपूर’ चा पाचवा वर्धापनदिन सोहळा २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध उपक्रमांसह उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता उद्घाटनाने झाली. डॉ. बी. डी. पालीवाल, भूलतज्ज्ञ, चंद्रपूर आणि डॉ. एस. एस. पालीवाल, सचिव, जनहिताय मंडळ, चंद्रपूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेला पाचव्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्त झालेल्या बांधवांनी ‘मद्यपाश हा एक आजार’, त्यावरील उपचारपद्धती तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या पाठपुराव्यामुळे सात्त्विक व व्यसनमुक्त जीवनशैली कशी स्वीकारली, याबाबत आपले अनुभव व्यक्त केले. त्यानंतर दारूमुक्ती केंद्राचे माजी प्रकल्प समन्वयक मारुतीजी साव यांनी व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन केले.
सायबर क्राईम जनजागृती आणि मोबाईल ॲडिक्शन या विषयावर सायबर गुन्हे शाखा, चंद्रपूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजावर अली यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. प्रमुख पाहुणे पोलीस पडोली, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक सुधाकरजी कोकोडे यांनी व्यसनामुळे समाजात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते हरीशजी शर्मा यांनी व्यसनामुळे व्यक्ती कुटुंब आणि समाजापासून कशी दुरावते, याबाबत मार्गदर्शन केले.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. किरणजी देशपांडे यांनी समाजात वाढत असलेल्या मानसिक आजारांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. एस. आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोलीच्या प्राचार्य डॉ. ममता ठाकूरवार यांनी युवा पिढीतील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी हुसेन सर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात रुग्ण बांधवांचा कृतज्ञता सोहळा, गुणवंतांचा सत्कार तसेच व्यसनमुक्त बांधव आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. व्यसनमुक्तीच्या कार्यात योगदान देणाऱ्या किशोरपथ आणि धन्वंतरी समूहाचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशजी पालीवाल यांनी केले. सूत्रसंचालन सपना दिंडे यांनी, कार्यशाळेचे संचालन प्रफुल लोणारे यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी सोनुले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झेप आणि झेप नई दिशाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, त्यांचे कुटुंबीय तसेच किशोरपथ व धन्वंतरी समूह, चंद्रपूर, ऊर्जानगर, लोणारा, भद्रावती, येरगाव, कोठारी आणि आवळपूर येथील नागरिक व सदस्य उपस्थित होते.



0 Comments