चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
"गौ" तस्करांचे मुसक्या आवळणार कोण?
‘हप्ते’ घेऊन जनावरांच्या अवैध वाहतुकीला मोकळा रस्ता? गडचांदूर-जिवती-तेलंगणा मार्गावर नागरिकांचा गंभीर सवाल
हकानी शेख, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती/गडचांदूर : गडचांदूर येथे दर मंगळवारी बैल, गाय, म्हैस, शेळी आदी जनावरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारातून खरेदी करण्यात आलेल्या जनावरांची तेलंगणा राज्याच्या दिशेने नियमबाह्य पद्धतीने वाहतूक होत असल्याची चर्चा सध्या गडचांदूरसह जिवती तालुक्यात रंगली आहे. विशेषतः बैलांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गडचांदूर येथून पाटणमार्गे नंदप्पा, भारीच्या दिशेने तेलंगणा राज्यात जाणारा मार्ग तसेच गडचांदूर-पाटण-शेणगाव-टेकामांडवा मार्गे तेलंगणाच्या दिशेने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. या मार्गावर विविध ठिकाणी पोलीस यंत्रणेची उपस्थिती असतानाही अवैध वाहतूक सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत.
गडचांदूर, पाटण, पिट्टीगुडा, भारी, टेकामांडवा आणि जिवती या परिसरातून वाहतूक होत असल्याच्या चर्चेमुळे संबंधित पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर ही वाहतूक नियमबाह्य असेल, तर ती रोखण्यासाठी नियमित तपासणी, वाहनांची कागदपत्रे तपासणे आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘हप्ते’च्या चर्चेची चौकशी होणार का?
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, काही गवतस्करांकडून विविध ठिकाणी ‘हप्ता’ दिला जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, अशी चर्चा का निर्माण झाली आणि त्यामागे काही तथ्य आहे का, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
काही ठिकाणी संबंधित लोकच चहाच्या हॉटेलवर बसून ‘आमच्या जनावरांच्या गाड्या कोणत्याही अडथळ्याविना या मार्गाने जातात’, अशा स्वरूपाच्या बढाया मारत असल्याचीही चर्चा आहे. हे दावे खरे आहेत की केवळ अफवा आहेत, हे पोलिसांच्या स्वतंत्र चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते.
कारवाईपेक्षा ‘मूक संमती’ तर नाही ना?
जनावरांची वाहतूक कायदेशीर कागदपत्रे, प्राण्यांची स्थिती, वाहतुकीचे नियम आणि संबंधित परवानग्यांचे पालन करूनच होणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणेने केवळ पाहत राहण्याऐवजी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
एकीकडे जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कायदे व नियम अस्तित्वात असताना, दुसरीकडे त्याच मार्गावरून वारंवार वाहने जात असतील आणि त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर हे दुर्लक्ष कोणाच्या हितासाठी आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवावी
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गडचांदूर-जिवती-तेलंगणा सीमाभागातील मार्गांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी. आठवडी बाजारातून जनावरे खरेदी केल्यानंतर त्यांची वाहतूक कोणत्या नियमांनुसार होत आहे, याची तपासणी करावी. वाहनांची कागदपत्रे तसेच जनावरांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच ‘हप्ते’ घेतले जात असल्याच्या चर्चेत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी आणि आरोप निराधार असल्यास तेही स्पष्टपणे जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
जनावरांच्या वाहतुकीच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये. ‘गवतस्करांचे मुसक्या आवळणार का?’ हा प्रश्न आता केवळ नागरिकांचा नसून संबंधित प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी ठरणार आहे.



0 Comments