Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

इयत्ता ९ वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 



इयत्ता ९ वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

सांगली, दि. ३० जून : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली यांच्या वतीने इयत्ता ९ वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात करण्यात आलेल्या बदलांविरोधात आज मा. जिल्हाधिकारी, सांगली यांच्यामार्फत NCERT, नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले.

नवीन सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता (Secularism) आणि समाजवाद (Socialism) या मूलभूत मूल्यांचा स्पष्ट उल्लेख कमी झाल्याची बाब चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे (Preamble) महत्त्व विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात समजावून सांगितले जात नसल्याचे दिसून येत असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय, मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात आल्याच्या वृत्तांमुळे शिक्षणातील संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे नमूद करण्यात आले.

शाळांमध्ये सर्व जाती, धर्म, भाषा व सामाजिक स्तरांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभाव, समानता, बंधुता, परस्पर आदर, संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच नागरिक हक्क व कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हे शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख कर्तव्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही एका धर्माचे किंवा विचारसरणीचे वर्चस्व शिक्षण व्यवस्थेत जाणवू नये, अशीही मागणी करण्यात आली.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने NCERT कडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

• इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात धर्मनिरपेक्षता व समाजवाद या संविधानिक मूल्यांचा स्पष्ट समावेश करावा.
• भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे शिकवावे.
• संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, सर्वधर्म समभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम विकसित करावा.
• कोणत्याही धार्मिक किंवा वादग्रस्त ग्रंथातील मजकूर समाविष्ट करताना संविधानिक मूल्यांना बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी.
• सदर बदलांबाबत NCERT ने अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे.

यावेळी शिवाजी उर्फ पवन वाघमारे (जिल्हाध्यक्ष), ऋषिकेश माने (सांगली जिल्हा निरीक्षक), अशोक लोंढे, सतीश शिकलगार, गुरुदत्त चंदनशिवे, विशाल कोठावळे, हर्ष लोंढे तसेच वंचित बहुजन आघाडी व वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

– सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली

Post a Comment

0 Comments